ही कथा अल्पविराम या कथेचा उर्वरित भाग आहे. आदित्य ने सिद्धार्थ च्या शरीरात प्रवेश केला होता आणि पूजा ला ही सगळं उमगलं होत. ती स्तब्ध झाली होती. आदित्य चे भास होण्याइतपत ठीक होत पण हे असं त्याला सिद्धार्थ च्या शरीरात प्रवेश करणं तिच्या कल्पनाशक्तीच्या पलीकडचं होतं.

“सिद्धार्थ तुम्ही हे सगळं खोटं करताय ना? तुम्हाला माझ्या बद्दल कळलंय आणि ते सगळं माझ्या तोंडून ऐकून घेण्यासाठी हे सगळं नाटक करत आहात. माझ्यावर विश्वास ठेवा मी खरच खूप दिवसांपासून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत होती..”

पूजा घाबरत सगळं सांगत होती तोच तिचे बोलणे अर्ध्यात थांबवत आदित्य म्हणाला “मला हे सगळं सांगायची गरज नाही, मी आदित्यच आहे, काल कॉलेज च्या टेरेस वर खरच मी होतो. तो तुझा भास नव्हता. काळाच्या ओघाने गेले कित्येक महिने तिथेच अडकलो होतो. खूप वाट पाहत होतो तुझी, तू तिथे आलीस आणि मला पाहिलेस. तिथून मुक्त व्हायचा क्षण आला आणि आज मी इथे तुझ्या समोर आहे”
हे ऐकून पूजा ला हळूहळू विश्वास बसू लागला होता की हे खरंच घडलंय. तो पुन्हा तिच्या आयुष्यात परत आलाय. तिला खूप आनंद झाला होता. इतके दिवस ज्या व्यक्तीच्या आठवणीत ती झुरत होती आज तो तिच्या आयुष्यात परत आला होता. तिला अस वाटत होतं की तीच जून प्रेम तिला पुन्हा मिळालंय. त्याच्याकडे पाहत तिने त्याच्या चेहऱ्याला स्पर्श करायला हात पुढे नेला तसे तिच्या हातातल्या बंगड्या वाजल्या. हिरवा चुडा, तिच्या सौभाग्याची निशाणी. एक क्षणासाठी सिद्धार्थ चा विचार मनात आला आणि ती पुन्हा भानावर आली. ती झटकन 2 पाऊलं मागे सरकली.

“नाही आदित्य हे चुकीचं आहे, माझं लग्न झालय आता सिद्धार्थ शी” पूजा धीर एकटवत म्हणाली.
“हो. या शरीराशी तुझं लग्न झालंय, पण यात आत्मा माझा आहे, तुझ्या आदित्य चा आहे ज्याच्यावर तू प्रेम केलस. यात काही चुकीचं नाहीये” आदित्य तिला समजवू लागला.
पूजा काही वेळ विचारात गढून गेली. सिद्धार्थ च्या शरीरातील आदित्य ही तिच्या उत्तराची वाट पाहत तिच्या कडे एक टक पाहत होता. बराच वेळ कोणीही बोलत नव्हते आणि शेवटी पूजा त्या शांततेला भंग करत म्हणू लागली “हे बघ आदित्य, मी लग्न फक्त या शरीराशी केलं नाहीये. माझं मन, माझा आत्मा हे आता फक्त सिद्धार्थ चे आहे. सिद्धार्थ च आता माझं सर्वस्व आहे.”

“त्याच्यासाठी तू आपल्या प्रेमाची आहुती देणार आहेस का?” आदित्य जोरात ओरडला. त्याचा राग त्या खोलीतल्या वस्तूंमध्ये उतरला होता. खोलीतल्या वस्तू हादरायला लागल्या कारण एक अमानवीय शक्ती तिच्या शी संवाद साधत होती. तो पुन्हा ओरडून म्हणाला “तू माझी आहेस आणि माझीच राहणार”.

आदित्य चे हे रूप पाहून पूजा भयंकर घाबरली होती. तिच्या तोंडून एक शब्दही फुटत नव्हता. तिला कळून चुकले होते की आदित्य जरी परत आला असला तरी हा आदित्य तो मुळीच नाही ज्याच्यावर मी जीवापाड प्रेम केले होते. पण या सगळ्या गोष्टींचा आता विचार करणे व्यर्थ होते कारण खूप उशीर झाला होता.

तेवढ्यात त्यांचा पाळलेला कुत्रा लिओ रूमच्या बाहेर येऊन भुंकू लागला. रूम चा दरवाजा बंद होता पण कदाचित त्याला ही या अमानवीय शक्तीची चाहूल जाणवू लागली होती. आदित्य ने रूम चा दरवाजा उघडला तसे लिओ ने त्याच्या अंगावर झेप घेतली आणि त्याला चाऊ लागला. पण आदित्य ने कसला ही विचार न करता एक झटक्यात त्याची मान पकडून मागच्या बाजूला वळवली आणि अतिशय निर्दयीपणे मोडून टाकली. लिओ वेदनेने कळवळत होता, तडफडत होता पण आदित्य ने त्याचा जीव जाई पर्यंत त्याला तसेच पकडून ठेवले होते. पण त्याची क्रूर नजर मात्र पूजा ला न्याहाळत होती.

तिला रडू अनावर झाला होत. तीने आदित्य चे हे रूप कधी ही पाहिले नव्हते. ती प्रचंड घाबरली होती. एका निष्पाप मुक्या प्राण्याचा जीव गेला होता. तिने भरलेल्या आवाजात विचारले “हे काय केलस तू, हे सगळं का करतोयस. तुला जे हवय ते नाही होऊ शकत. तू प्लिज निघून जा इथून”
तिचे बोलणे ऐकून तो भयंकर संतापला, तो रखरखत्या नजरेने पूजा कडे पाहत म्हणाला “सगळे मी ठरवेन पूजा.. ज्या दिवशी तू माझ्या प्रेमाचा अख्या जगा समोर स्वीकार केलास त्या क्षणी तू संपूर्ण माझी झाली होतीस आणि हे आता कोणीही बदलू शकत नाही.. जर माझं प्रेम मला मिळालं नाही तर मी तुझं सौभाग्य ही संपवून टाकीन.. विसरू नकोस की सिद्धार्थ चा आत्मा माझ्या ताब्यात आहे. या कुत्र्यासारखे त्याला ही चिरडायला मला वेळ लागणार नाही”.

आदित्यने बोलणे संपवल्यावर भिंतीकडे असलेल्या पूजा आणि सिद्धार्थ च्या फोटो फ्रेम कडे नजर वळवली आणि पुढच्याच क्षणी ती फोटो फ्रेम जमिनीवर पडून फुटली. त्याने पुन्हा पूजाकडे नजर वळवली आणि अतिशय किळसवाण्या आवाजात म्हणाला “तुला उद्या पर्यंत ची वेळ देतोय, सिद्धार्थ च्या शरीरातील आदित्य शी संसार करायचा की पुढचे आयुष्य विधवे सारखे घालवायचे”. त्याचे बोलणे ऐकून पूजा निशब्द झाली आणि तिथेच जमिनीवर कोसळली.

निपचितपणे मरून पडलेल्या लिओ ला जवळ घेऊन हुंदका देत रडू लागली. त्याला मांडीवर घेऊन पूर्ण रात्रभर तशीच बसून राहिली.

वर्दळ सुरू झाल्यामुळे ती भानावर आली. तिच्या गालावरून ओघळलेले अश्रू आता सुकून गेले होते. जमिनीवर पडून फुटलेल्या फोटोवर तिची नजर स्थिरावली होती. ती पुन्हा आठवणीत गढून गेली. पण या वेळी आठवणी कॉलेज च्या किंवा आदित्य च्या नसून सिद्धार्थ च्या होत्या. सिद्धार्थ बरोबर घालवलेला प्रत्येक क्षण तिच्या समोर एखाद्या चित्रपटासारखा सरकत होता.

आदित्य च्या अतृप्त आत्म्या पेक्षा स्वतःच्या शरीरात कोंडल्या गेलेल्या सिद्धार्थ च्या आत्म्यासाठी तिचं मन अधिकच अस्वस्थ झाल होत. स्वतःच्या परिस्थिती चा विचार न करता सिद्धार्थ ला यातून कसं परत आणायचे यासाठी ची चल-बिचल चालू झाली. पण तिच्यासाठी याहून ही महत्वाचं होत ते म्हणजे कुटुंबियांची आदित्य पासून रक्षा करणं.
पूजा ने लगेच च सिद्धार्थ च्या आई वडिलांना घरापासून काही अंतरावर असलेल्या देवळात जाण्यासाठी कसे बसे मनवले. त्यांना देवळात सोडून ती घरी परतली आणि तिचे लक्ष तिच्या स्कुटी च्या सीट वर गेले. त्यावर आज ही एक गुलाब आणि त्यात एक लेटर होतं. पण ह्या वेळी त्यात कविता नव्हती. आदित्य ने तिला रात्री कॉलेज ला बोलावले होते. ती भीती अजूनही तशीच होती पण त्याचे ऐकण्या व्यतिरिक्त तिच्याकडे कोणताही पर्याय नव्हता.

संपूर्ण दिवस तिने कसा बसा घालवला. तिने दिवसभरात एक अन्नाचा कण ही घेतला नव्हता कारण तिला कसलेच भान नव्हते. एकच विचार “सिद्धार्थ ला पुन्हा परत आणायचं”. ती उठून देव्हाऱ्यासमोर जाऊन बसली आणि सिद्धार्थ ला सुखरूप ठेवण्या साठी प्रार्थना करू लागली. कुलदेवीचे नामस्मरण करत तिने मंगळसूत्राची ही पूजा केली आणि डायरी घेऊन कॉलेज ला जायला निघाली.

ती तिच्याच विश्वात असल्यासारखी गाडी चालवत होती. काही वेळानंतर ती कॉलेज ला पोहोचली. गाडी पार्किंग लॉट मध्ये लावून वॉचमन जवळ चालत गेली. खोटं नाट कारण सांगून ती आत जाण्यासाठी परवानगी मागू लागली पण तो काही ऐकायला तयार नव्हता. पण त्याला कसं बसं समजावून विनवण्या करून त्याने तिला आत सोडले.
आत गेल्यावर तिची नजर आपसूक पणे टेरेस वर गेली आणि तिच्या काळजात धस्स झालं. आदित्य पाय खाली मोकळे सोडून टेरेस च्या कठड्यावर बसला होता. तिने एक क्षणही न घालवता वर जायला जिना चढायला सुरुवात केली. भराभर पायऱ्या चढून ती टेरेस वर आली. तिने समोर पाहिले आणि तिच्या काळजात चर्रर्रर्र झालं. त्या कठड्यावर कोणीही नव्हते. आदित्यने सिद्धार्थ च्या शरीराला संपवण्यासाठी खाली उडी तर मारली नसेल या कल्पनेने तिचे काळीज धडधडू लागले. ती धावत काठड्याजवळ गेली आणि खाली पाहू लागली. तितक्यात मागून तिला हाक ऐकू आली “माऊ”..

आता तिला घाबरून चालणार नव्हते. या जीवघेण्या परीक्षेत तिला कसही करून फक्त यशस्वी व्हायचं होतं. तिने धीर एकटवून मागे वळून पाहिले. सिद्धार्थ अतिशय वयस्क दिसत होता.चेहऱ्या वरचे संपूर्ण तेज निघून गेले होते. डोळ्या खाली काळी वर्तुळ दिसत होती आणि त्वचा एखाद्या चुरगळलेल्या कागदासारखी वाटत होती.
“हे काय केलस तू सिद्धार्थ ला” पूजा जड आवाजात म्हणाली.

त्याने ऐकून न ऐकल्यासारखे केले आणि विचारले “आपल्या नात्याबद्दल काय ठरवले आहेस तू?, आज खूप दिवसांनी तुला तोच प्रश्न विचारतोय हो किंवा नाही, मला तुझं उत्तर हवय”..

तिचे डोळे अश्रूंनी भरून आले होते. ती नाईलाजाने म्हणाली “तुला जे हवय ते मान्य करण्या वाचून दुसरा काही पर्याय आहे का माझ्याकडे? हो मी तयार आहे माझे पूर्ण आयुष्य तुला हवे तसे जगण्यासाठी.. माझं हे शरीर तुझं आहे आता”
“अस का म्हणतेय माऊ. मला फक्त तुझं शरीर नकोय. तुझं प्रेम तुझं मन हवय मला”.. आदित्य म्हणाला.

“ते कसं मिळेल तुला आदित्य. तू तो आदित्य नाहीयेस ज्याच्यावर मी प्रेम केलं होतं. तुला मी ओळ्खतच नाही. प्रेमाचा अर्थ तरी कळतो तुला? नुसते कविता करणे आणि गुलाब पाठवणं म्हणजे प्रेम नाही. आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याला त्रास झाला तर आपलं काळीज तुटत. ह्याला प्रेम म्हणतात. त्याला बरं नसलं तरी आपली तहान भूक विसरून त्याची काळजी घेणं याला प्रेम म्हणतात. प्रेम उघड पणे व्यक्त नाही केलं तरी छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये ते दिसून येत. बरं झालं तू परत आलास. इतके दिवस मी सिद्धार्थ चे प्रेम समजू नव्हते शकले. पण काल तू गेल्यानंतर मला त्याची जाणीव झाली” पूजा अश्रू पुसत त्याला समजावत होती.
“हे सगळं ऐकून आदित्य संतापाने लालबुंद झाला होता. तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत तो चालत टेरेसच्या कठड्यावर चढला आणि मागे फिरून पुन्हा तिला विचारले “माऊ… हो किंवा नाही”

पूजा ने स्वतःचे बोलणे सुरूच ठेवले होते “आणि माझ्या आत्म्याचे सांगशील तर तो ह्या जन्मीच काय येत्या सगळ्या जन्मासाठी सिद्धार्थ चा झालाय.  सप्तपदी चालून जेव्हा मी त्याची पत्नी झाले त्या वेळेस मी त्याला काही वचनं दिली आहेत, त्याने ती पूर्ण केली आणि आता माझी पाळी आहे..”
पूजा ने एवढे बोलून स्वतःची डायरी पर्स मधून काढली आणि आदित्य ने लिहिलेली सगळी पत्र घेऊन म्हणाली “ह्या त्या आदित्य च्या आठवणी आहेत ज्यांच्यावर मी प्रेम केलं होतं. पण ज्या क्षणी तू इथून पडून जीव गमावलास त्या क्षणी हे सारं काही संपल, तू तो आदित्य नाहीस” तिने सगळी पत्र फाडून हवेत भिरकावली.
“पूजा….” आदित्य जोरात ओरडला.

आज पर्यंत तू माझ्या साठी कविता कारायचास ना, आज मी ही एक कविता केली आहे.

आंधळं प्रेम नसतंच या जगात,

तुला ओळखून कळलं मला,झालं मला प्रेम एका मृगजळावर,न जाणता करू नये प्रेम कोणावर,सूर्य मावळला सावली निघून गेली,त्याच्या आठवणीत मी ही कण कण जळुन गेली,पण पुन्हा आयुष्याला आशेची नवीन उम्मीद मिळाली,अग्नीला साक्षी मानून मी त्याची अर्धांगिनी झाली,माझ्या सुख दुःखाचा साक्षीदार आता तोच आहे,त्याचा अंत माझ्या आयुष्याचा पूर्णविराम आहे.
इतकं बोलून पूजा ला भोवळ आली आणि त्याच क्षणी ती जमिनीवर कोसळली.

तिला शुद्ध आली तेव्हा ती तिच्या बेड वर होती. ती लगेच सिद्धार्थ ला हाका मारू लागली. तेवढ्यात बाजूलाच बसलेल्या सिद्धार्थ ने तिच्या कापळवरून हात फिरवला आणि तिला शांत करत झोपून राहायला सांगितले. तो अगदी नॉर्मल वाटत होता जस काही झालच नाही. त्याचे तेज परत आले होते. काही वेळानंतर पूजा उठून बसली. घडलेलं सगळं तिला एखाद्या वाईट स्वप्नासारखं भासत होत. आता सिद्धार्थ पुन्हा आल्याचे पाहून तिला आदित्य चा विचार ही मनात आणायचा नव्हता. पण बाहेर आल्यावर तिचे लक्ष तिच्या स्कुटी च्या सीट वर गेले आणि तिच्या पायाच्या खालची जमीनच सरकली. पुन्हा एक पत्र आणि गुलाब. दबक्या पावलांनी ती पुढे चालत गेली आणि थरथरत्या हातानी ते पत्र हातात घेतलं.

“पूजा अजून कविता नाही. हे माझं शेवटचं पत्र. तू मला खऱ्या प्रेमाचा अर्थ समजावून दिलास. जाणीव करून दिलीस की ज्याच्यावर आपण जीवापाड प्रेम करतो त्याच्या आनंदात आपला आनंद असतो. मी वाट चुकलो होतो. यापुढे तुझ्या आणि सिद्धार्थ च्या आयुष्याला आदित्य नावाचे ग्रहण कधीच लागणार नाही. कायम सुखी रहा”..
पत्र वाचत असताना तिच्या डोक्यातून अश्रू वाहत राहिले.. एका अतृप्त आत्म्याला तिने कायमचं मुक्त केलं होतं आणि आपल्या सौभाग्याची रक्षा करण्यात ती यशस्वी झाली होती. 

Leave a Reply