अनुभव – शशांक निंबरे

मी भूत, आत्मा या गोष्टींवर आधी विश्वास ठेवत नव्हतो पण या अनुभवानंतर बरच काही बदलले. हा अनुभव आहे या वर्षातल्या जुलै महिन्यात ला. सगळीकडे मुसळधार पाऊस चालू होता. आम्ही मित्रांनी फिरायला जायचा प्लॅन केला. मी मुंबई उपनगरात असलेल्या नालासोपाऱ्यात राहतो. आणि माझे तीन मित्र श्याम, सुहास आणि नचिकेत मुंबई त राहतात. माझे ऑफिस गोरेगाव ला आहे आणि हा माझा ऑफिस चा ग्रुप. ठरल्या प्रमाणे सगळ्यांनी एखादी चांगली जागा शोधायला सुरुवात केली. आम्हाला जास्त खर्च न करता जवळच एखादी निवांत जागा हवी होती म्हणून भाईंदर जवळ च्या उत्तन बीच वर जायचा बेत पक्का केला.

लागलीच इंटरनेट वरून तिथली सगळी माहिती काढली. कसे जायचे, कुठे फिरायचे म्हणजे फिरण्यासाठी चांगले स्पॉट वैगरे. पण काही केल्या राहण्यासाठी लॉज मिळत नव्हते. काही लॉज होते पण ते आमच्या खिशाला परवडणारे नव्हते त्यामुळे सगळा प्लॅन फिसकटतोय की काय असे वाटू लागले. पण अचानक रात्री श्याम ला एका अनोळखी नंबर वरून फोन आला. समोरून एक बाई चौकशी करत होती की तुम्हाला रूम हवी आहे का ?. श्याम ने विचारले तुम्ही कुठून बोलत आहात आणि तुम्हाला माझा नंबर कुठून मिळाला.? काही वेळ समोरून काहीच प्रतिसाद आला नाही म्हणून त्याने फोन कट केला. त्याला वाटले की कोणी मित्र मस्करी करत असावा. पण त्याच रात्री साधारण १२.३० च्या सुमारास पुन्हा त्याच नंबर वरून फोन आला. ती बाई विचारत होती की तुम्ही रूम बुक करणार आहात का?.. नाही तर ऐन वेळी याल तेव्हा रूम मिळणार नाही. त्याने किंमत विचारली तर जेवण धरून ६०० रुपये. रेट ऐकून त्याने एका क्षणात होकार कळवला आणि पत्ता लिहून घेतला. उद्या संध्याकाळ पर्यंत पोहोचतो असे सांगून फोन ठेवला. 

दुसऱ्या दिवशी सकाळी मला आणि दोघा मित्रांना फोन करून कळवले की राहायची सोय झाली, आपण आज दुपारीच निघतोय. स्वस्तात सोय झाली असली तरी मला शंका येत होती की त्या परिसरात इतका रेट चालू असताना हे असे कोणते लॉज आहे. मी श्याम ला फोन करून विचारले की तू लॉज चे फोटो वैगरे घेतलेस का.? त्यावर तो म्हणाला “ते तिकडे गेल्यावर बघू रे, जास्त विचार नको करुस, तयारी ला लाग”. मी ही ठीक आहे म्हणत विषय सोडून दिला आणि निघायची तयारी करू लागलो. ठरलेल्या वेळेत आम्ही भाईंदर रेल्वे स्टेशनवर येऊन पोहोचलो. रिक्षा साठी खूप खटपट करावी लागली पण शेवटी एक रिक्षा वाला तयार झाला. पण आम्ही बसल्या बसल्या त्याने विचारले उत्तन मध्ये कुठे चाललात. श्याम ने त्याला लॉज चे नाव आणि पत्ता सांगितला तसा तो रिक्षा वाला जरा विचारत पडला. आम्ही सगळे एकत्र च म्हणालो “काय झालं भाऊ?”. 

तसे तो रिक्षावाला म्हणाला “मी गेले १० वर्ष या मार्गावर रिक्षा चालवतोय पण तुम्ही सांगितले तसे कोणते लॉज मला तरी माहीत नाही. सुहास त्याचे वाक्य तोडत म्हणाला “असे कसे आम्हाला हेच नाव सांगितले त्यांनी”. त्यावर तो रिक्षावाला म्हणाला “ठीक आहे साहेब तुम्हाला मी उत्तन ला सोडतो, तिथे कोणाला विचारून घ्या.” साधारण अर्ध्या तासानंतर आम्ही त्या ठिकाणी येऊन पोहोचलो. नचिकेत श्याम ला म्हणाला “त्या बाईला फोन करून विचार कुठून कसे जायचे ते, एक तर पाऊस थांबायचे नाव घेत नाहीये”. श्याम ने फोन लावायचा प्रयत्न केला पण नेमके त्या भागात नेटवर्क अगदी कमी होते म्हणून फोन लागत नव्हता. तो म्हणाला “काय यार, कुठे गावात आलो आपण, इथे फोन ल रेंज ही नाहीये”. साधारण १०-१५ वेळा प्रयत्न केल्यावर शेवटी फोन लागला. त्याने पुन्हा पत्ता विचारला तर ती बाई कुत्सितपणे हसू लागली. श्याम ला थोड्या वेळा पुरता काही कळलेच नाही. तो थोडा चिडून च म्हणाला सगळे ठीक आहे ना की आम्ही जाऊ परत. तेवढ्यात ती बाई पुन्हा हसत म्हणाली “अहो असे कसे तुमचे नशीबच तुम्हाला इथे घेऊन येणार, नशीब कधीच कोणाला चुकत नाही”. श्याम आता चांगलाच भडकला. बाईमाणुस म्हणून तो काहीच बोलला नाही आणि तसाच रागात फोन कट करायला गेला तेवढ्यात त्या बाई ने कुठून कसे यायचे ते सांगितले. येताना कोणाशी बोलू नका असेही म्हणा ली. श्याम आधीच वैतागला होता त्यात हे नवीन ऐकून अजुन संतापून म्हणाला “का बाई अस का बरं? आम्ही बोललो नाही विचारले नाही कोणाला तर आम्हाला पत्ता कसा सापडेल? रोज येत नाही हा एरिया माहीत असायला.” त्यावर ती हसतच म्हणाली “इथे अजून बरेच हॉटेल, लॉज आहेत.. त्यांना कळले की इतक्या कमी किमतीत मी रूम देते तर प्रोब्लेम होईल”. श्याम ने रागातच ठीक आहे येतो आम्ही असे म्हणत फोन ठेवला आणि आम्हाला म्हणाला “काय विचित्र लोक असतात यार.. इथे आपण नवीन आहोत, इतका पाऊस चालू आहे आणि या बाईला फालतू मस्करी सुचते य, एखादा माणूस असता तर आतापर्यंत खूप शिव्या खाल्ल्या असत्या माझ्या तोंडून”. तसे मी म्हणालो “जाऊदे रे, सोड, आपण कशासाठी आलोय इथे, एन्जॉय करायला मग ते करू तू उगाच कशाला मुड ऑफ करून घेतोय स्वतःचा”. माझे बोलणे ऐकून तो थोडा शांत झाला. 

आम्ही सांगितल्या प्रमाणे चालत पुढे निघालो. तिने जो रस्ता सांगितला होता तो कच्चा रस्ता होता. जस जसे आम्ही त्या रस्त्याने आत चालत जाऊ लागलो तसे जाणवले की आम्ही गावापासून वस्तीपासून बऱ्याच दूर आलो आहोत. गर्द झाडी आणि निर्मनुष्य परिसर. आम्ही जवळपास ४० मिनिट चालत होतो. मुसळधार पाऊस पडत असल्याने काळया ढगांचे सावट पसरले होते आणि त्यात आजू बाजूला गर्द झाडी असल्यामुळे खूप अंधार पसरल्या सारखे वाटत होते. मला थोडं विचित्र वाटू लागलं की इथे कुठे आलोय आपण. मी न राहवून श्याम ला म्हणालो “श्याम तू नीट विचारायला हवे होते रे, आपण जंगलात खूप आत आलो आहोत”. त्यावर तो काहीच म्हणाला नाही. शांतपणे पुढे चालत जात होता. शेवटी समोर बंगला दिसू लागला तसे आम्हाला हायसे वाटले की चला बरोबर रस्त्यावर आहोत आपण.

जसे बंगल्या जवळ आलो तसे अजूनच विचित्र वाटू लागलं. एक वेगळीच शांतता होती तिथे. नचिकेत पुढे गेला आणि त्याने दरवाजाच्या वरची बेल वाजवली. पण २-३ मिनिट थांबून ही कोणी दार उघडले नाही. म्हणून मग त्याने दरवाज्यावर थाप मारायला हात पुढे केला तसा दरवाजा आत ढकलला गेला. बहुतेक उघडाच होता. आता गेलो तसे समोर एक सुंदर बाई उभी होती. अस वाटत होत की नुकताच लग्न झालंय अगदी नटून थटून उभी होती. ती इतकी सुंदर दिसत होती की आम्ही सगळे तिला पाहतच राहिलो. पण नंतर आम्हाला जरा अवडघडल्या सारखेच झाले. आम्ही काही विचारणार तितक्यात ती श्याम कडे पाहत म्हणाली “यायला काही त्रास तर नाही झाला ना?” त्याने ही तिच्याकडे पाहत नकारार्थी मान हलवली आणि म्हणाला “नाही. आम्ही बरोबर आलो”. तसे ती पुढे म्हणाली “तुम्ही फ्रेश व्हा, रूम या बाजूला आहे. मी नाश्ता आणते” आणि आत निघून गेली. तिने दाखवलेल्या दिशेने आत चालत गेलो तर समोर एक मोठी आलिशान रूम होती. आम्ही फ्रेश झालो. साधारण ७ वाजत आले होते. मी खिडकीतून बाहेर पहिले तर बंगल्याची मागची बाजू, हिरवीगार बाग आणि बागे पलिकडे समुद्र पाहून अगदी छान वाटल. तिथेच थोडावेळ स्थिरावलो. नकळत मी बंगल्यातून बाहेर पडलो आणि आजूबाजूचा परिसर न्याहाळू लागलो. मला त्या बंगल्यात त्या बाई व्यतिरिक्त कोणीच नजरेस पडले नाही. मनात विचार डोकावून गेला की वस्तीपासून इतक्या लांब घर आणि त्यात ही बाई एकटी राहतेय. काही तरी गौडबंगाल नक्कीच आहे. 

तितक्यात मला चाहूल जाणवली की माझ्या मागे कोणी तरी उभे आहे. मी दचकून मागे पाहिले पण मागे कोणीही नव्हते. काही वेळा चालत बंगल्याच्या कंपाऊंड पाशी आलो तसे पुन्हा जाणवले की माझ्या मागे कोणी तरी उभी आहे. मी मागे वळलो आणि एका क्षणासाठी दचकलो. मागे श्याम उभा होता. मी त्याला विचारले “काय भाई.. काय खतरनाक जागा शोधून काढली आहेस”. त्यावर तो काहीच म्हणाला नाही. बंगल्या कडे एक टक बघत होता. मी त्याला पुन्हा विचारले “काय झाले रे, सगळे ठीक आहे ना, आल्यापासून बघतोय तू खूप शांत शांत आहेस, कोणाबरोबर काही बिनसलेय का?” तसे तो म्हणाला “काही नाही. बंगल्याच्या परिसरातून बाहेर जाऊ नकोस” मला जरा वेगळेच जाणवले पण नंतर वाटले काळजी पोटी बोलत असावा. मी त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि आम्ही दोघं बंगल्यात आलो. आम्ही सगळे मस्तीच्या मुड मध्ये होतो आणि गप्पा गोष्टी करत होतो. पण श्याम मात्र शांत च होता. कोण जाणे काय बिनसले होते त्याचे. 

बराच वेळ झाला तरी नाश्ता आला नव्हता तसे सुहास श्याम ला मस्करीत म्हणाला “अरे तुझ्या फोन वाली ला सांग नाश्ता लवकर आणायला भूक लागली आहे सगळ्यांना. तसे श्याम उठला आणि सुहास कडे वळून अतिशय रागात म्हणाला “तिचे नाव सुमित्रा आहे, आदराने बोल जरा”. त्याचे डोळे रागाने लालबुंद झाले आहे. आम्ही जरा घाबरलो च. कारण त्या बाईने अजुन आम्हाला कोणालाच तिचे नाव सांगितले नव्हते. श्याम चे हे असे वागणे सगळ्यांना खटकले. आम्ही एकमेकांकडे पाहिले आणि आम्हाला कळून चुकले की हा काही वेगळा प्रकार आहे. मला तर अस वाटत होत की हा श्याम नाहीच. तितक्यात ती बाई आत आली. हिरवी साडी, अंगावर भरपूर दागिने. मी मनात केलं इतके दागिने कोणी घरात घालून फिरत तरी का. तिने आणलेला नाश्ता आमच्या पुढ्यात आणून ठेवला. आम्ही जास्त विचार न करता नाश्ता करू लागलो. मी न राहवून त्या बाई ला विचारले “तुमचा बंगला खूप छान आहे, इथे नोकर वैगरे नाहीत का?”. त्यावर तिने काहीच उत्तरं दिल नाही आणि मलाच चुकल्यासारखे झाले. पण थोड्या वेळा नंतर ती म्हणाली “माझा नवरा येईल रात्री २ पर्यंत”. तसे मी म्हणालो “इतक्या रात्री.. काय काम करतात ते”. “समजेल तुम्हाला” इतके म्हणून ती खोलीतून बाहेर निघून गेली. 

श्याम मला म्हणाला तुझे उरकले असेल तर आपण जरा बाहेर फेर फटका मारून येऊ. मी उरलेले २-३ घास पटकन घेऊन श्याम सोबत बंगल्याच्या बाहेर पडलो. आम्ही चालत बऱ्याच लांब आलो. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि रडायला लागला. मी घाबरलो आणि त्याला विचारले “अरे काय झाले रडायला”. त्याने सांगायला सुरुवात केली तसे माझ्या हाता पायाला कंप सुटू लागला. तो म्हणाला “ती सुमित्रा कोणी साधी बाई नाही.. ती एक चेटूक करणारी बाई आहे.. आपण येताना ती आपल्या सतत मागे होती.. तिने माझ्यावर मोहिनी च घातली होती.. तुम्ही माझ्याशी बोलत होता, मला विचारत होता, सगळे ऐकत होतो मी. पण मला तुमच्याशी काही बोलताच येत नव्हते.. आणि हो ती बाई एकटी नाहीये त्या बंगल्यात तिच्या बरोबर अजुन एक अमानवीय शक्ती आहे..”

मी म्हणालो “श्याम तू हे काय सांगतोय, तुला तरी कळतेय का?”.. तसे तो म्हणाला “हो..माझा मनुष्य गण आहे मला या सगळ्या गोष्टी दिसतात. आपण जेव्हा बंगल्यात शिरलो तेव्हा फक्त ती बाई आपल्या समोर उभी नव्हती. तिच्या मागे अजुन कोणी तरी होतं. एक काळसर आकृती जी आपल्याला एक टक पाहत होती. माझे शांत राहण्याचे हेच कारण होते.”

काय करावे काही सुचत नव्हते. नचिकेत आणि सुहास अजूनही बंगल्यात होते. श्याम म्हणाला “बघ मी पुन्हा आत गेलो तर मी ती पुन्हा माझ्यावर मोहिनी घालेल आणि मी काहीही करू शकणार नाही.” मी मनात च पक्के केले की काही झाले तरी आपण सगळे इथून सुखरूप पणे बाहेर पडायचे. मी देवाचे नाव घेतले आणि श्याम ला घेऊन पुन्हा बंगल्यात गेलो. आत शिरल्यावर एक घाणेरडा वास येऊ लागला जसे मांस सडले आहे. मी त्या दोघांना बोलवायला म्हणून रूम मध्ये गेलो तर ते दोघेही तिथे नव्हते.  

मी किचन कडे पाहायला गेलो तर दरवाजा बंद होता तसे मी मागे फिरलो. पण अचानक त्या बंद किचन मधून कसला तरी आवाज ऐकू आला. मी दरवाजाच्या फटीतून काही दिसतंय का ते पाहू लागलो. आतले दृश्य पाहून माझे हृदय धड धडू लागले. तीच बाई तीच साडी, दागिने पण रूप एखाद्या जक्खड म्हातारी सारखे. मित्रांना हाक मारायला म्हणून मी तोंड उघडले पण भीतीने माझी वाचाच बसली होती. तितक्यात मला जाणवले की माझ्या मागे कोणी तरी येऊन उभे होते. ती चाहूल जाणवताच सर्वांगातून विजेची लहर जावी तसे मी शहारलो. मागे श्याम उभा होता. मी त्याला खुणावू लागलो की आपल्याला इथून निघायला हवे. पण बघता बघता श्याम ने भिंती वर सरपटत चढायला सुरुवात केली. त्याच्या शरीरात एका अमानवीय शक्ती ने प्रवेश केला होता. माझ्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता की मी हे काय पाहतोय. तितक्यात तो एक भरड्या किळसवाण्या आवाजात म्हणाला “मी श्याम नाही.. मी सुमित्रा चा नवरा.. ४० वर्षांपूर्वी माझा वाहन अपघातात आकस्मित मृत्यू झाला होता. पण या बाईने मला इथे जखडून ठेवले आहे. मला अजूनही मुक्ती मिळाली नाही. मला तुम्हा कोणालाच इजा पोहोचवायची नाही. तुम्ही जमेल तितक्या लवकर या बंगल्याच्या हद्दीतून बाहेर पडा नाही तर सुमित्रा तुम्हाला जिवंत सोडणार नाही. पण जाताना माझे एक काम करा. माझ्या अस्थींचे विसर्जन करा म्हणजे मला मुक्ती मिळेल. ” एवढं बोलून त्याने श्याम च शरीर सोडलं तसा श्याम जमिनीवर निपचित होऊन पडला. 

कसे बसे करून मी श्याम ला शुद्धीत आणले आणि त्याला घेऊन बंगल्याच्या बाहेर पडलो. समोर दारातच नचिकेत आणि सुहास बेशुद्ध होऊन पडले होते. मी त्यांच्या तोंडावर पाणी शिंपडले तसे ते भानावर आले. त्यांना म्हणालो “आपल्याला इथून आत्ताच्या आत्ता निघायला हवे, हा वेगळा प्रकार आहे, आपण इथे थांबलो तर आपले काही खरे नाही”. मी त्यांना घेऊन आल्या मार्गी जायला निघालो तर श्याम.. श्याम कुठे गेला कुणास ठाऊक. आम्ही तिघेही त्याला शोधायला लागलो, तितक्यात तो बंगल्यातून बाहेर धावत आला. त्याच्या हातात लाल कपड्यात गुंडाळलेला एक तांब्या होता. मी त्याला विचारले “श्याम हे काय?”. तो म्हणाला “अस्थी..”. मला सगळे कळले आणि आम्ही चौघेही तिथून धावत सुटलो. श्याम म्हणाला माझ्या मागून या.. तसे आम्ही त्याने सांगितल्या प्रमाणे जिवाच्या आकांताने पळू लागलो. तितक्यात मागून एक पुरुषी आवजतली कर्णकर्कश किंचाळी ऐकू आली. त्या बाई ला कळले होते की आम्ही पळून जात आहोत. मी ओरडलो “मागे बघू नका.. धावत रहा..”.

पण श्याम धावताना खूप धापा टाकत होता, मी निरखून पाहिले तर त्याचे शर्ट मागून रक्ताने पूर्ण माखले होते. काही अंतर धावत गेल्यावर तो वेदनेने खाली पडला. तसे आम्ही त्याला उचलले आणि पुन्हा धावू लागलो. आम्ही समुद्र किनारी आलो तसे श्याम ने तो डबा समुद्राच्या पाण्यात टाकायला सांगितला. आम्ही त्याने सांगितल्याप्रमाणे केले तसे मागे दूरवर असलेल्या त्या बंगल्यातून पुन्हा एक कर्णकर्कश किंचाळी ऐकू आली. आम्ही कसे बसे रस्ता शोधत वस्तीच्या ठिकाणी येऊन पोहोचलो. तिथेच एक दवाखाना होता तिथे श्याम वर उपचार करवले. त्याला मी विचारले “काय होते रे त्या लाल फडक्यात ?..” तसे तो म्हणाला “त्या बाईच्या नवऱ्याच्या अस्थी होत्या, आपण अस्थी विसर्जन केलं आणि त्याला मुक्ती मिळाली”. आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी घरी आलो. वाहनाला अपघात झाल्याचे सांगून आम्ही घडलेला प्रकार लपवला पण मी काही शांत बसणाऱ्या तला नव्हतो. मी पुन्हा त्या बंगल्याची माहिती काढायला सुरुवात केली. माझ्या एका मित्राला घेऊन उत्तन गावात गेलो पण तिथले लोक म्हणाले की असा कोणता बंगलाच अस्तिवात नाही. मला लक्षात आले की तो रिक्षा वाला ही म्हणत होता की असे कुठले ठिकाण, बंगला नाहीये तिथे. ती बाई कोण होती, आणि श्याम च्याच मागे का लागली होती, तो निनावी फोन नक्की तिनेच केला होता का असे कित्येक प्रश्न अजूनही मला अनुत्तरित आहेत.

Leave a Reply