अनुभव – सागर भंडारे

मी, विकास आणि विनय आम्ही तिघे जिवलग मित्र आहोत. आम्ही एकाच वयाचे असल्याने आमचे ट्युनिंग ही छान जमायचे. सहज म्हणून एके दिवशी विकास ने कोकणात जायचा प्लॅन केला. ती आमची पहिली कोकण ट्रीप होती. आम्ही मूळचे साताऱ्याचे असल्यामुळे समुद्र किनारा, तिथले वातावरण याबद्दल खूप आकर्षण होते त्यामुळे आम्ही पटकन तयार ही झालो. ६ डिसेंबर तारीख नक्की केली. सगळ्यात आधी श्रीवर्धन नंतर हरिहरेश्वर ला दर्शन घेऊन मग दापोली. आम्ही तिघे ही खूप उत्साही होतो. विनय त्याची गाडी घेऊन मला घरी घ्यायला आला. मी सामान गाडीत ठेवत होतो तितक्यात माझे बाबा म्हणाले “कोकणात जात आहात तर रात्रीचा प्रवास शक्यतो टाळा”. माझे बाबा सिव्हिल इंजिनिअर होते आणि त्यांनी १० वर्ष कोकण भागात नोकरी केली होती. मी बाबांना कारण विचारले त्यावर ते म्हणाले “तुम्ही सुजाण आहात, जास्त काही सांगत नाही पण मुख्य रस्त्याने जा. वेळ वाचवण्यासाठी कोणत्याही आड मार्गाने जाऊ नका”. मी बाबांना हो म्हंटल आणि जास्त काही न विचारता गाडीत बसलो. रस्त्यात विकास चे घर आले. तो बाहेरच येऊन आमची वाट बघत थांबला होता. त्याला घेऊन आम्ही प्रवासाला सुरुवात केली.

आम्ही तिघेही खूप खुश होतो. गाडीत गाणी लाऊन मजा मस्ती करत अगदी ठरल्याप्रमाणे वेळेत श्रीवर्धन ला येऊन पोहोचलो. आम्ही ट्री हाऊस बुक केले होते. तो दिवस अगदी मजेत गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आम्ही हरिहरेश्वर चे दर्शन घेतले. तिथेच जेवण उरकले आणि दुपारी मंदिराच्या मागच्या बाजूला दगडांवर गप्पा मारत बसलो.निसर्गाच्या सानिध्यात आल्यामुळे खूप प्रसन्न वाटत होते. गप्पा करता करता वेळ कसा निघून गेला याचे भानच राहिले नाही. आम्हाला लक्षात आले की खूप उशीर झालाय आणि जाताना फेरी ने म्हणजेच बोटीने जायचे आहे. त्याशिवाय दापोली ला वेळेत पोहोचणे शक्य नाही. आम्ही जायला निघालो. फेरी ने आम्ही पलिकडे येऊन पोहोचलो. तिथे जाण्याची आमची पहिलीच वेळ होती. आम्ही रस्त्यातल्या एका पान टपरी वर गाडी थांबवून रस्ता विचारून घेतला. त्याने आम्हाला २ रस्ते सांगितले. विनय म्हणाला की गाडीत ठरवू कोणत्या मार्गाने जायचे. तसे आम्ही गाडीत बसलो आणि पुढच्या प्रवासाला लागलो.

डिसेंबर महिना थंडीचे दिवस असल्यामुळे लवकर अंधार पडायला सुरुवात झाली होती. काही अंतर पार केल्यावर आम्हाला एक चायनीज चे दुकान दिसले. तसे विनय ने गाडी थांबवली. मी उतरून पार्सल ची ऑर्डर दिली आणि घरी फोन करून कुठे आहोत हे कळवायला फोन हातात घेतला. पण तिथे अजिबात नेटवर्क नव्हते. मी विनय आणि विकास कडे फोन मागितला पण त्यांच्याही फोन ला नेटवर्क नव्हते. शेवटी तिथल्याच एका लांडलाईन ने घरी फोन केला. वडिलांनी काळजी पोटी पुन्हा एकदा आठवण करून दिली की रात्री प्रवास करणे टाळा. पण मी फक्त हो म्हणत त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. तिथून निघण्या आधी तिथे काम करणाऱ्या एका वृध्द बाईला आम्ही पुन्हा रस्ता विचारून घेतला. तिनेही त्या माणसा प्रमाणे आम्हाला २ रस्ते सांगितले. आम्ही एकमेकांत ठरवून दुसऱ्या मार्गाने जायचे निश्चित केले कारण त्यात ३० किमी ड्राईव्ह कमी करावे लागणार होते. ती बाई आमचे बोलणे लांबूनच ऐकत होती. आम्ही गाडीत बसू लागलो तशी ती बाई म्हणाली की पोरांनो त्या रस्त्याने जाताना मध्ये एक गाव लागेल, तिथे थांबून कोणाला काही विचारत बसू नका, तसेच पुढे जात रहा आणि पुलावरून च पलिकडे जा. तसे मी त्यांना कारण विचारले.

तितक्यात त्यांचा मुलगा मागून येत म्हणाला ‘ते तुम्हाला नाही कळणार, नवीन दिसताय म्हणून सांगतोय जाताना पुलावरून च पलिकडे जा ‘. आम्हाला जरा विचित्रच वाटल पण विषय जास्त न वाढवता आम्ही हो म्हणत तिथून निघालो. मी सहज म्हणून मागे वळून पाहिलं तर ती बाई नकारार्थी मान हलवत त्या रस्त्यावर थांबू नका हे सांगण्याचा प्रयत्न करत होती. मी विनयला म्हणालो की ती बाई अजुन काही तरी खुणावतेय. पण त्याने जाऊ दे म्हणत दुर्लक्ष केलं. 
का कोण जाणे पण त्या बाईचा चेहरा डोळ्यासमोरून जात नव्हता. तिने सांगितलेले वाक्य सतत आठवत होते. त्यात बाबांनी सांगितलेले आठवायला लागले तसे मी शांत बसून विचार करू लागलो. तितक्यात गाडीत मंद आवाजात लावलेल्या गाण्याचा आवाज आपोआप वाढला तसा मी आवाज लहान केला. पुन्हा काही वेळा नंतर तो आवाज वाढला तसे विनय ने टेप बंद च केला. बराच वेळ उलटुन गेला होता. हळू हळू आम्हाला वस्ती दिसू लागली आणि त्या बाई ने सांगितल्या प्रमाणे एक गाव आले. विनय म्हणाला की आपण कुठे ही न थांबता सरळ पुलावरून पलिकडे जाऊ. पण त्या गावातून जाताना मला वाटू लागले की आपण रस्ता चुकतोय आणि हा योग्य मार्ग नाहीये. मी विनय ला म्हणालो की गाडी थांबव मी कोणाला तरी विचारून घेतो. तसा विनय म्हणाला की त्या बाईने सांगितले असून सुद्धा तू असे म्हणतोय. पण शेवटी माझ्या आग्रहाखातर त्याने गाडी थांबवली. 

मी गाडीतून खाली उतरलो आणि थोडे मागे चालत गेलो. रस्त्याहून थोड्या आतल्या बाजूला एक मोठा आलिशान बंगला होता. आणि त्याच्या समोरच्या गार्डन मध्ये एक माणूस ड्रिंक्स घेत बसला होता. मी लांबूनच त्याला विचारले “काका दापोली ला जाण्यासाठी हाच रस्ता आहे का?” त्यावर तो म्हणाला की “इथून नका जाऊ, पुल तुटलाय आणि त्याचे काम चालू आहे म्हणून तो बंद आहे, इथून खालच्या बाजूने जा म्हणजे सरळ पलीकडून निघाल ‘मी ठीक आहे म्हणत गाडीत जाऊन बसलो. विनय ला कसे जायचे हे समजावून सांगितले. पुलाजवळ आल्यावर आम्ही गाडी खालच्या रस्त्याला वळवली. जसे आम्ही त्या रस्त्याला लागलो मला अगदी विचित्र वाटायला लागलं. या आधी मी रात्री अपरात्री निर्मनुष्य रस्त्यावरून एकट्याने प्रवास केलाय त्यामुळे मला त्याचे अप्रूप नव्हते. पण इथे एक वेगळीच बोचरी थंडी लागत होती. मला नक्की सांगता येणार नाही पण खूप अस्वस्थ वाटू लागलं होत. 

बराच वेळ झाला पण हेड लाईट च्या प्रकाशा शिवाय काहीच दृष्टीस पडत नव्हते. आता मात्र आम्ही जरा घाबरलो. तितक्यात पुढे पाहिले तर पाणी दिसू लागले आणि गाडी चे टायर मातीत रुतले. विनय ने गाडी रेस करायला सुरुवात केली तरीही गाडी जागची हलत नव्हती. शेवटी मी आणि विकास गाडी ढकलायला खाली उतरलो. माझ्या पायाला वाळू लागली तसे मी ओरडलो अरे आपण समुद्र किनारी आलोय. आणि अगदी आत आलो आहोत. मी विनय ला म्हणालो गाडी रिव्हर्स गेअर मध्ये टाक आम्ही पुढून धक्का देतो. मी पुढे जाऊन गाडी ढकलायचा प्रयत्न करत होतो. पण विकास मागे वळून त्या पाण्याकडे एक टक बघत होता. मी पूर्ण ताकदीने गाडी ला धक्का देण्याचा प्रयत्न करत होतो आणि विकास नुसता उभा होता. मी त्याला चिडून हाक मारली तसे तो भानावर आला. मी त्याच्या चेहऱ्या कडे पाहिले. तो भीतीने पांढरा पडला होता. त्याच्या चेहऱ्यावर कसले हावभाव नव्हते पण तो प्रचंड घाबरला होता. मला कळून चुकले की काही तरी विपरीत घडलेय. मी त्याला काहीही न बोलता संपूर्ण ताकदनिशी गाडी ढकलली आणि ती कशी बशी बाहेर निघाली. विनय जोरात रेस करत असल्यामुळे गाडी बाहेर निघाल्यावर ब्रेक मारे पर्यंत बरीच मागे गेली. 

तसा विकास शिव्या देत धावत आला आणि गाडीत येऊन बसला. मी चालत येऊन गाडीत बसलो पण विनय ला काहीच बोललो नाही. मला त्या जागेवर असताना तो विषय काढायचा नव्हता. स्वतःवर संयम ठेऊन मी शांत बसून राहिलो. मला बाबांनी सांगितलेले वाक्य आठवले की रात्री प्रवास करू नका, आणि निर्मनुष्य ठिकाणी चालत असताना मागे कसलीही चाहूल जाणवली तरी मागे वळून पाहू नका. खरं सांगायचं तर मला गाडी कडे चालत असताना माझ्या मागून कोणी तरी येतंय अस सतत जाणवत होत. पण मी मागे वळून पाहिलं नव्हतं. घडलेल्या प्रकारावरून ही रात्र आमच्यासाठी किती भयानक ठरणार होती याचा अंदाज मला आला होता. आम्ही पुन्हा आल्या मार्गी परत जाऊ लागलो पण जाताना पुलावरून गेलो. पुलाचे कुठलेही काम चालू आहे असे अजिबात जाणवले नाही. पुढे आल्यावर माझे लक्ष त्या बंगल्याकडे गेले. तो बंगला ओसाड पडला होता जसे गेले कित्येक वर्ष तिथे कोणी फिरकले ही नाहीये. मी विनय कडे पाहिले आणि आम्हा दोघांना कळून चुकले की आमच्या सोबत नक्की काय घडतेय. आम्ही काहीही बोललो नाही. कदाचित बोलून आम्हाला ती भीती अजिबात दाखवायची नव्हती. 

१०-१५ मिनिट सगळे शांत च होतो. सगळे गंभीर असल्याचे पाहून विनय ने मस्करी करत विषय काढला आणि जोक करू लागला. मी ही मुद्दामून दुर्लक्ष करून त्याला साथ देऊ लागलो. पण मागच्या सिट वर बसलेला विकास मात्र काहीच प्रतिसाद देत नव्हता. कसलेही हावभाव नसल्या सारखा सरळ एक टक रस्त्या कडे पाहत होता. आम्ही दोघांनी त ओळखल होत पण त्याला विचारायचं धाडस होत नव्हत. मी समोरच्या आरश्यातून मागे विकास ला पाहत होतो. अगदी निर्विकार चेहरा. तितक्यात त्याने त्या आरश्यात पाहिले आणि नजरा नजर झाली. त्याची नजर बदलली होती. अतिशय क्रूर झाली होती. मी लगेच नजर वळवून बाजूला पाहू लागलो. आता मात्र मी प्रचंड घाबरलो. मला त्या थंडगार वातावरणात ही दरदरून घाम फुटला. तितक्यात विकास ने विचारले “किती लांब आलोय रे आपण ” तसा विनय म्हणाला “२०-२५ किलोमीटर आलो असू”तसे त्याने खिडकीची काच खाली केली आणि तोंडात दाबून भरलेला राईस बाहेर काढला. काही वेळा साठी आम्हाला काही कळलेच नाही. मी जेव्हा मागे वळून पाहिले तेव्हा कळले की त्याने पार्सल उघडून राईस खाल्लाय. पण असा. 

घडणाऱ्या घटना आता वेगळ्याच वळण घेऊ लागल्या होत्या. मी धीर एकटवून त्याला विचारले “विकास काय होतंय तुला” तसे त्याने जोरात रडायला सुरुवात केली. विनय ने दचकून गाडी रस्त्याच्या कडेला नेऊन वेग कमी केला. तसा विकास म्हणाला “विनय गाडी अजिबात थांबवू नको तुझ्या पाया पडतो गाडी चलावत रहा”. मी त्याला पुन्हा विचारले “विकास शांत हो आधी आणि सांग काय झालंय तुला?” पण तो काहीच बोलला नाही फक्त भीती ने रडत होता. काही वेळा नंतर तो शांत झाला आणि सांगू लागला. त्या किनाऱ्याजवळ मला नवरीच्या वेशात एक सुंदर मुलगी दिसली. इतक्या रात्री ही इथे एकटी काय करतेय असा विचार करून मी तिच्याकडे निरखून पाहू लागलो तशी ती माझ्याकडे बघून हसली. ती दिसायला इतकी सुंदर होती की नकळत मी ही स्मित हास्य केलं. तसे ती मला तिच्याकडे यायला खुणावू लागली. मला कळत नव्हत की मला काय होतंय. मी दोन पाऊल मागे सरकलो आणि तितक्यात एक लाट किनाऱ्यावर येऊन आदळली. त्याचे पाणी तिच्या चेहऱ्यावर उडाले आणि क्षणात तिचे रुप पालटले. केस मोकळे सुटले, पांढर फट्टक चेहरा, तोंडात एकही दात नाही, तिचे अक्राळ विक्राळ रूप पाहून माझ्या शरीरातला त्राण च निघून गेला. मी धावत सुटलो कारण मी मागे खेचला जात होतो. अस वाटत होत की माझं शर्ट कोणी तरी ताणून धरलय.

मी त्याला म्हणालो “अरे इतक्या वेळ तू आम्हाला काहीच का नाही बोललास”. त्यावर विकास जे म्हणाला ते ऐकून आमची वाचाच बंद झाली. छाती धडधडू लागली आणि हात पाय थंड पडले. तो म्हणाला की मी काहीच बोलू शकलो नाही कारण “गाडीत आपण फक्त तिघ नव्हतो.” खरी भीती काय असते हे मी त्या दिवशी अनुभवलं. पुढचे काही क्षण आम्ही कोणीच काही बोललो नाही. जोपर्यंत दपोली येत नाही तोपर्यंत विनय गाडी चालवत राहिला. पोहोचल्यावर आम्ही हॉटेल रूम बुक केली. जेवायची अजिबात इच्छा नव्हती म्हणून आम्ही तसेच झोपून गेलो. रात्री कसल्यातरी आवाजाने जाग आली तसे मी उठलो आणि पाहतो तर विकास असंबंध बडबडत होता आणि शॉक लागल्यासारखा व्हीवळत होता. मी विनय ला जागे केले. आम्हाला काय करावे हे सुचत नव्हते. विनय म्हणाला की आता जर याला उठवले तर हा काय करेल काही सांगता येणार नाही. मी मनात देवाचा धावा करायला सुरुवात केली. तासाभराने उजाडू लागले तसे विकास शांत होत गाढ झोपून गेला.

सकाळी आम्ही उठलो आणि आवरून घेतले. थोड्या वेळाने विकास ला जाग आली. तो अगदी पूर्वी सारखा वागत होता हे बघून जरा बरं वाटलं. बाजूलाच दत्ताच मंदिर होत. आम्ही जाताना तिथे वळलो. नीट दर्शन घेतल आणि परतीच्या प्रवासाला लागलो.

त्या ठिकाणी नक्की काय होत, विकास ला काय झालं होत हे शोधण्याच्या फंदात आम्ही कधीच पडलो नाही. पण त्या घटने मुळे आम्हाला आयुष्यभराची शिकवण मात्र मिळाली. त्या नंतर आम्ही साधारण ६ वेळा कोकणात गेलो पण रात्रीचा प्रवास केला नाही आणि आड मार्गाने मुळीच गेलो नाही. 

Leave a Reply