ही गोष्ट आहे ऑगस्ट 2014 ची. तेव्हा मी कॉलेज मध्ये होतो आणि नुकतेच आम्ही नवीन घरात शिफ्ट ही झालो होतो. आमचे जुने घर ही बाजूच्या बिल्डिंग मध्येच होते. ऑगस्ट महिना असल्याने गणपती उत्सवाची जोरदार तयारी चालू होती. आमच्या सोसायटीत सार्वजनिक मंडळाचा गणपती बसायचा. आणि इतर मंडळाप्रमाणे आम्ही सुद्धा रात्रभर डेकोरेशन ची काम करायचो.

त्या दिवशी ही मी तसाच रात्री उशिरा पर्यंत थांबलो होतो आणि काम आटोपल्यावर घरी जाण्या साठी निघालो. साधारण 1.30 वाजला असेल. माझे घर 7व्या मजल्यावर होते. त्या दिवशी काही तरी बिघाड झाल्यामुळे लिफ्ट ही बंद होती म्हणून मी जिन्याने पायऱ्या चढत वर जाऊ लागलो. सवय नसल्यामुळे 5 मजले चढून दमलो म्हणून तिथेच जरा वेळ थांबलो. 2-3 मिनिटानंतर मी 6व्या माजल्याच्या पायऱ्या चढायला सुरुवात केली. मजला चढून वर आलो तर तिथे एक मुलगी उभी दिसली. साधारण 20 वर्षांची असेल ती. तिच्या चेहऱ्यावर कसलेच हाव भाव नव्हते. मला जरा विचित्रच वाटलं. इतक्या रात्री ही मुलगी इथे काय करतेय असा विचार मनात डोकावून गेला. तिने माझ्याकडे पाहिलं आणि 7व्या मजल्यावर जाऊ लागली. त्या मुलीला मी या आधी कधीच बिल्डिंग मध्ये पाहिलं नव्हतं. पुढच्याच क्षणी वाटले की ही चोरीच्या उद्देशाने तर आली नसेल इथे..

मी झटकन तिच्या मागे धावत वर गेलो. ती तिथेच उभी होती. मी तिला आवाज दिला तरीही दुर्लक्ष करत ती पुढे चालत गेली आणि बाल्कनीत जाऊन थांबली. बघता बघता ती बाल्कनीच्या कठड्यावर चढली आणि पुढच्या क्षणी तिने खाली उडी मारली. 

घडलेला प्रकार पाहून माझं काळीज धडधडू लागलं, हातापायाला कंप सुटला, काही सुचेनास झालं. मी तसाच धावत बाल्कनीत आलो आणि खाली वाकून पाहू लागलो. पण 7वा मजला आणि खाली अंधार त्यामुळे काहीच दिसत नव्हतं. मी धावतच खाली आलो आणि त्या बाल्कनी च्या खालच्या बाजूला येऊन अंधारात चाचपडत पाहू लागलो. पण ती मुलगी दृष्टीस पडत नव्हती. तितक्यात बिल्डिंग चा वॉचमन धावत आला आणि विचारू लागला ‘काय झालं साहेब, तुम्ही परत खाली का आलात’. पण मी त्याला काहीच सांगण्याच्या मनस्थितीत नव्हतो. तो तसाच आश्चर्याच्या नजरेने मला पाहत होता. मी वेड्यासारखा 10 मिनिट तिथेच त्या मुलीला शोधत होतो. बहुतेक झोप अनावर झाल्यामुळे विचित्र भास झाला असेल असा विचार करून शेवटी काही न बोलता मी पुन्हा घरी जायला निघालो. 

मी पुन्हा सहाव्या मजल्यावर पोहोचलो आणि या वेळेस जे पाहिले त्याने मला दरदरून घाम फुटला आणि माझी वाचाच बंद झाली. मी प्रचंड घाबरलो होतो. समोर पुन्हा तीच मुलगी उभी होती. पण बघता बघता काही वेळातच तिथे साधारण तिच्याच वयाचा किंवा तिच्याहून थोडा मोठा मुलगा तिथे आला. त्या दोघांनी माझ्याकडे एक विचित्र कटाक्ष टाकला आणि 7व्या माजल्याकडे चालायला सुरुवात केली. उरली सुरली सगळी हिम्मत एकटवून मी त्यांच्या मागे चालत 7व्या मजल्यावर आलो. मला काहीच उमजत नव्हते की नक्की काय चालले आहे. ती मुलगी तशीच चालत त्याच बाल्कनीत गेली, तिच्या सोबत असलेल्या मुलाकडे एकदा पाहिले आणि पुन्हा खाली उडी मारली. बघता बघता त्या मुलाने ही तिच्या मागोमाग खाली उडी मारली.

आता मात्र भीतीने माझे हातपाय लटपटत होते, तरीही मी संपूर्ण शक्ती एकटवून तसाच त्या बाल्कनीत गेलो आणि खाली वाकून पाहिले. जे पाहिले ते मी उभ्या आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही. ते दृश्य पाहून माझे काळीज भीतीने धडधडत छाती फोडून बाहेर येतंय की काय असे जाणवू लागले. कारण भिंतीवर असलेल्या पाईप वर ते दोघेही उलटे लटकून मला एक टक पाहत होते. माझ्या शरीरातला त्राण संपला आणि मला भोवळ आली. मी त्या बाल्कनीत च बेशुद्ध होऊन पडलो.

सकाळी जेव्हा मला जाग आली तेव्हा मी माझ्या बेड वर होतो. सगळे मला विचारत होते की नक्की काय झाले. त्या वेळी काय घडले हे मी कोणालाच सांगू शकलो नाही. पण काही दिवसानंतर मी माझ्या आई ला आणि शेजारच्या काकूंना घडलेला भयंकर प्रकार सांगितला. त्या काकु ना कदाचित हा प्रकार माहीत होता. त्या म्हणाल्या की साधारण 5 वर्षांपूर्वी याच बिल्डिंग मध्ये एका मुलीने 7व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्याच ठिकाणी एका मुलाने वरून उडी मारून आपला जीव दिला. नंतर कळले की त्यांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम होते आणि वेगळ्या जातीत असल्यामुळे घरच्यांना हे मान्य नव्हते. शेवटी कंटाळून त्या मुलीने आत्महत्या केली आणि तिच्या जाण्याने विरह सहन न झाल्याने दुसऱ्या दिवशी त्या मुलाने ही आपले जीवन संपवले. ते दोघे रात्री अपरात्री लोकांना दिसतात आणि तुझ्याबाबत ही तेच घडले.

काही दिवसांनी आम्ही ते घर विकून दुसरी कडे राहायला गेलो. हा भयंकर प्रसंग मी उभ्या आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही. कदाचित माझी वेळ चांगली होती म्हणून मी वाचलो.

Leave a Reply